Tuesday, April 9, 2013



"आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली"चे सल्लागार-सभासद डॉ. दत्ता पवार, एमए (मराठी), एमए (हिंदी), बीएड, पीएचडी. यांना कांदिवलीस्थित "साई सेवा मंडळ" यांचा यंदाचा "कांदिवली जीवनगौरव पुरस्कार २०१३" जाहिर झाला आहे.

मंगळवार दि. ९ एप्रिल २०१३ रोजी रात्री ८ वा. मुंबईचे महापौर श्री. सुनिल प्रभु यांचे अध्यक्षतेखाली कांदिवली गावठाण, कांदिवली (पश्चिम) येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते श्री. मनोहर जोशी यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्य म्हणून विद्यादानाचे कार्य करत असतानाच डॉ. पवार यांनी मुंबई विद्यापीठाच्या सीनेट, अ‍ॅकॅडेमिक काउन्सिल, मराठी बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी ऑफ आर्टस, एक्झामिनेशन कमिटी, स्टुडटस वेल्फेअर कमिटी, बहि:शाल शिक्षण समिती इ. समितींवर कार्य करताना १९७८ साली "मराठी भाषा अन्यायनिर्मूलन परिषदे"ची स्थापना व आयोजन करुन मागील ३०-३५ वार्षांपासुन विविध माध्यमांतुन मराठी भाषेसाठी विशेष कार्य केलेले आहे.

त्याचप्रमाणे राजा शिवाजी वाझ्मयीन मिथ, कोपरखळ्या, प्रस्थान, मराठी भाषा : उपेक्षा आणि अपेक्षा या साहित्यसंपदेसह विविध नियतकालिकातुन लेखन केले आहे.

आजही वयाच्या ७४ व्या वर्षी ते त्याच आस्थेने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या "मराठी संशोधन मंडळा"चे संचालक व मंडळाच्या "मराठी संशोधन पत्रिका" या त्रैमासिकाचे संपादक म्हणुन कार्यरत आहेत.

अशा एका मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असलेल्या सच्च्या मराठीप्रेमीचा "कांदिवली जीवनगौरव पुरस्कार २०१३" पुरस्कारने करण्यात येणारा गौरव हा माझ्यासाठी व परिवारातील-परिचयातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद क्षण आहे.
आपणही या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंगाळवार दि. ९ एप्रिल २०१३ रोजी रात्री ८ वा.पुरस्कार सोहळ्याला आवर्जुन यावे, ही विनंती.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली