Thursday, February 14, 2013

शतकोत्तर १४वा म्हणजेच ११४वा कार्यक्रम...


आजकाल मुंबईत दोन मराठी माणसं सहज गप्पा मारतानाही आपली मातृभाषा विसरुन हिंदी/इंग्रजीत बोलताना दिसतात. अपवादानेच मराठीत बोलत असली तरीही त्यात हिंदी-इंग्रजी भाषेतील शब्दांचा सर्रासपणे वापर करताना दिसून येतात. याला कारणीभूत आहे आपली - मराठी माणसाची मातृभाषेप्रतीची बेफिकीरी, उदासिनवृत्ती व बोटचेपेपणा... आणि म्हणुनच आज गरज आहे ती आपली - मराठी माणसाची मानसिकता बदलण्याची...

याचा एक भाग म्हणुन
२७ फेब्रुवारी रोजी - कविवर्य कुसुमाग्रज यांचे जन्मदिनी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधुन
"आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली" या आपल्या समाजाभिमुख उपक्रमाच्या वतीने

शनिवार दि. २३ फेब्रुवारी २०१३ रोजी सायं. ५.३० वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर - लिंकरोडलगत, कांदिवली (प.) येथे
आगळ्यावेळ्या व मातृभाषेविषयीच्या आपल्या जाणीवा जागृत करणारी
"मराठीतच बोला..." - उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत आयत्या वेळी सुचवलेया एका विषयावर
स्पर्धकाने ३-४ मिनिटांचे भाष्य सादर करताना
मराठीशिवाय इतर कोणत्याही भाषेतील एकही शब्द वापरता येणार नाही.

मातृभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मुंबईकर - मराठी माणसाचा या स्पर्धेत सहभाग अपेक्षित असुन
कुटुंबिय व मित्रपरिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक





Friday, February 8, 2013

शतकोत्तर १३वा म्हणजेच ११३वा कार्यक्रम...

’आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’च्या ११३व्या कार्यक्रमान्तर्गत रवि. दि, १०.०२.२०१३ रोजी परिवारातील सहभागी-सभासदांची एकदिवस सहल जात आहे. या सहलीत उंबरगाव स्थित नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते आणि LIFETIME ACHIEVEMENT AWARD 2010 विजेते गांधीवादी शेतकरी श्री. भास्कर सावे गुरुजी यांच्या मागील ६० वर्षांच्या अथक प्रयत्नातुन उभा राहिलेल्या व त्यांच्या कुटुंबियाकडुनही तितक्याच आत्मीयतेने त्यांचा वारसा म्हणुन जोपासल्या जाणाऱ्या त्यांच्या “कल्पवृक्ष नैसर्गिक फार्म”ला भेट देऊन त्यांच्या नैसर्गिक/सेंद्रीय शेती पद्धतीविषयीची माहिती जाणुन घेतली जाणार आहे. या सहलीच्या माध्यमातुन शहरीकरणाच्या विळख्यात अडकुन यांत्रिकी जीवन जगणाऱ्या शहरीवासींचे शेती, शेतकरी आणि त्यांचे महनीय कार्य यासंबंधी उदबोधन करुन त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


सकाळी कांदिवली येथुन निघाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या वांद्री धरण व सातिवलीची उन्हेरे (उष्ण पाण्याचे कुंड) पाहून पुढे डहाणूची महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सहलीला सुरवात करण्यात येणार आहे. यानंतर बोर्डी बीचवर थोडावर विरंगुळा झाल्यानंतर थेट उंबरगावला जाणार आहोत. 


यानिमित्ताने आपल्यालाही आग्रहाची विनंती आहे की सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन एका पर्यावरण पुरक प्रकल्पाला भेट द्यायला आणि मागील ६०-६५ वर्षांपासुन घेतलेला ’नैसर्गिक शेतीचा वसा’ व्रत्स्थपणे जपणाऱ्या व जोपासणाऱ्या श्री. भास्कर सावे गुरुजी आणि कुटुंबियांचे मन:पुर्वक कौतुक करायला - निसर्गाला साथ देणाऱ्या एका निसर्गप्रेमी कुटुंबाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वंदन करायला आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायला आपणही कुटुंबिय व मित्रपरिवारासह या सहलीत आवर्जुन सहभागी व्हा...

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
९८२०४४०५७३/९८६९२४०५७३